मी वाचलेले सर्वात पहिले अवांतर पुस्तक म्हणजे अनिल आठल्ये लिखित 'प्रमाद'. मी लहानपणी सुट्टीत काकांकडे राहायला जायचो. तेव्हा तिथलं विशेष आकर्षण म्हणजे पुस्तकांच कपाट. त्यांच्याकडे गेलो कि हमखास मी त्या कपाटातली पुस्तकं चाळत असे. असाच एकदा पुस्तक चाळत असताना 'प्रमाद' हाती लागलं.

पुस्तक वरचेवर चाळून पाहिलं. भाषा सोपी वाटली. पुस्तक घरी घेऊन जायला कुणाची ना नसायची. घरी येऊन पुस्तक वाचायला सुरवात केली. पण मी वाचायला सुरवात केलेलं पुस्तक कादंबरी या प्रकारातला आहे याचा मला तेव्हा गंधही नव्हता. संवाद वगळून इतर वर्णनात्मक लिहिलं आहे त्याचा अर्थ सहज लागत होता पण संवाद कळत नव्हते. कोण कुणास म्हणाले हे सलग वाचून कळत नव्हते. तरीपण चिकाटीने पहिले प्रकरण वाचून काढले. पण पुन्हा दुसऱ्या प्रकरणाचा संबंध लागेना. या वेगवेगळ्या कथा म्हणावं तर कथा संपली नाही हे कळत होत. तसंच पुढची प्रकरणं वाचत राहिलो. मग हळूहळू कथा कळू लागली. पात्रं लक्षात आली. मग त्यांच्या अनुषंगाने संवाद कळू लागले. तसं पुन्हा सुरवातीपासून वाचायला सुरवात केली. नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला. भाषा तर सोपीच होती. ते पुस्तक मला वेगळ्या भावविश्वात घेऊन जात होतं हे लक्षात येऊ लागलं. हळूहळू करत संपूर्ण पुस्तक पूर्ण वाचून काढलं. ते पुस्तक म्हणजे एक सामाजिक कादंबरी होती. एक पीएचडी करणारी तरुणी प्रबंधासाठी 'बलात्कार' हा विषय निवडते पण दुर्दैवाने तिच्यावरच बलात्काराचा प्रसंग ओढवतो. अत्यंत हताश आणि पराभूत मनस्थितीत ती आपल्या वडिलांजवळ झाल्या प्रकारची कबुली देते. लग्नापूर्वीच प्रियकराला विश्वासात घेऊन सत्य हकीकत सांगते.... आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. संपूर्ण कथा इथे सांगणे उचित ठरणार नाही. पुस्तक तुम्ही मिळवून वाचू शकता. पुस्तक उदयदीप प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. पण सरतेशेवटी इतकेच सांगेन, कि या पुस्तकाने माझ्या मनाला एक वेगळीच समज आली. बलात्काराकडे पाहण्याची एक वेगळीच संवेदनशीलता दिली आणि त्यासोबतच पहिलेच अवांतर पुस्तक संपूर्ण वाचण्याचा आनंदही दिला. हे पुस्तक आयुष्यभर लक्षात राहील.

©निखिल धुरी डोंबिवलीकर
No comments:
Post a Comment